हरवलेली पाखरे.....
"दर्शन , मोबाईलवर बघ टीचर ने नवीन गृहपाठ दिला आहे." मोबाईल हातात भेटल्यावर खुश होणाऱ्या दर्शन ने आज मात्र काहीसे तोंड पडत , वैतागत मोबाईल हातात घेतला. व कधीही त्याच्या हातात मोबाईल न देणाऱ्या दर्शन च्या आई कडे दर्शन ला मोबाईल हातात घे असा आग्रह करताना बघतांना मला आश्चर्य च वाटले. "दीदी ,बघ ग टीचर रोज अभ्यास देतात मोबाईल वर आणि हा बघ ,त्याच्या आवडीच्या मोबाईल वर च  तर करायचा आहे तरी हा करत नाही." असे काहीतरी त्या बोलू लागल्या.
मोबाईल म्हणजे अमूल्य वेळ वाया घालवण्याचे साधन,विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनाची वाट लावायला आलेला एक करंटा मित्र. असे काहीसे सगळ्यांचे मत होते. पण आज आधी मोबाईल हाती घे आणि अभ्यासाला बस असे संवाद आज घराघरात ऐकू येवू लागले. मोबाईल ची कडक बंदी असलेली शाळा, आज मोबाईलच्या स्क्रीनवरच  येऊ लागली. पण या ऑनलाईन  शाळेत खरंच तो आनंद विद्यार्थी घेतली का?
सकाळी लवकर उठून ती केलेली शाळेची तयारी. ती बस किंवा रिक्षा काकांची वाट बघणे. आणि बरोबरच्या मित्रांबरोबर शाळेत जाताना केलेली धमाल. सकाळी शाळेत गेल्यावर ती सुरात गात असलेली प्रार्थना, अंगात उत्साह आणणारे ते जन गण मंनच राष्ट्रीय गीतं. मोठ्या आवाजात ते शिक्षकांना केलेले अभिवादन. ते रंगबेरंगी खडूंनी आकर्षक वाटणारे ते फळे आज कोरेच आहेत. तो वर्गात येणारा डस्टर, बेंच चां आवाज, ते गजबजनारे शाळेचे वरांढे. मोठ्या स्पर्धा, पराक्रम बघितलेले ते पटांगणे, आज ओस पडली आहेत. अगणित आनंद देणारा तो हातावर किंवा वहीवर मिळणारा तो Good आणि स्टार चा शेरा. शिक्षकांनी दिलेल्या त्या शिक्षा, मित्रान बरोबर अभ्यास करून शाळेने दिलेल्या उत्तरपत्रिका वर दिलेल्या त्या परिक्षा. याचा आनंद या ऑनलाईन शाळेत विद्यार्थ्यांना मिळेल का? जी मजा वर्गात हात वर करून ऐटीने शिक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं देण्यात होती ती ऑनलाईन चाट बॉक्स मध्ये भेटत असेल का? वर्गात सुरात वाजवलेल्या  टाळ्याआंचा जो नाद दुमदुमून जायचा तो स्क्रीन समोर बसून अनुभवता येईल का? जी मजा कॉलेज किंवा शाळेत जाऊन पण तास चुकवून भेटत असे. ती ऑनलाईन तास चुकवून कदाचित भेटणार नाही.
पुढे ऑनलाईन शाळा सुरू ही होतील पण त्यात एक कृत्रिम पणा असेल. फक्त पुस्तकी शिक्षण च नाही पण आयुष्यातील अनेक धडे त्या प्रत्यक्ष जिवंत शाळेत मिळत होते. त्या खळखळणाऱ्या धबधब्याचे आज फक्त एक शांत जलाशय झाले आहे. आज झाडांवर पक्ष्यांच्या किलबिलाटाने पक्ष्यांच्या शाळा भरू लागल्या. परंतु,  ओस पडलेला शाळा रुपी कल्पवृक्ष मात्र त्याच्या हरवलेल्या पाखरांची अजूनही वाट बघत उभा आहे.

लेखक- कु. समिक्षा श्रीधर केरकर





Comments

Popular posts from this blog

Dear 2024

Angel

Commitment!!