जून.....

आनंद, भीती, हुरहूर, उत्सुकता यांसारख्या संमिश्र भावना अनुभवायला लावणारा महिना म्हणजेच जून महिना. वर्षाचा मध्यबिंदू म्हणजेच जून महिना. उन्हाळ्याची झळ सोसल्यावर आनंदाच्या पर्जन्याची वेडी वाट बघायला लावणारा जून हा महिना. खरपूस भाजून निघालेल्या मातीचा पहिला सुगंध याच महिन्यात अनुभवायला मिळतो. शाळेच्या ओढीमुळे उन्हाळी सुट्टी संपवून गावातील आठवणी मनात साठवून; आंबा, फणस, काजू, नारळ, तांदूळ इत्यादी गावाकडील शिदोरी थोड्या दिवसांसाठी आपल्याजवळ घेऊनच आपण या महिन्यात परतत असतो. शाळा, कॉलेज कितीही नको वाटले तरी पुढचा वर्ग, नवीन पुस्तक, वह्या, दप्तर, कंपास पेटी, छत्री, रेनकोट यांचा आनंद याच महिन्यात भेटतो. वर्षाच्या पहिल्या महिन्यात पूर्ण न करू शकणारे संकल्प पुढील सहा महिन्यात पूर्ण करण्याची नवीन संधी देणारा हाच महिना.
नेहमी सारखेच आनंद देणारा जून महिना या वर्षी मात्र वेगळाच असेल. कदाचित नेहमी प्रमाणे पाऊस असेलही परंतु नेहमी प्रमाणे प्रत्यक्ष मनसोक्त चिंब त्यात भिजता येणार नाही. शाळा, कॉलेज परत सुरू होण्याचा उत्साह ओसरला असेल. यंदा जुने संकल्प सोडून नवीन जगण्याची कला आपल्याला आत्मसात करावी लागेल. कदाचित परंपरागत आपल्याला अडकून ठेवलेल्या सवयीं मधून बाहेर पडण्यासाठीच नवीन आधुनिक युगात जगणे शिकवण्यासाठी कडक शिक्षका च्या रुपात हे २०२० वर्ष आले असेल. उन्हाळ्यात होरपळून निघाल्यावर जून महिनाचा पाऊस जसा नवीन  हिरवी सृष्टी फुलवतो तसेच कठीण काळ विसरून जगण्याची नवीन पालवी ही आपल्या आयुष्यात तशीच  फुलेल अशी नवीन आशा या जुन महिन्यात करूया.


लेखक - कु. समीक्षा श्रीधर केरकर

Comments

Anonymous said…
सुंदर! खरंच यंदाचं मान्सून नवीन संकल्पांनी सुरु होणार...
Anonymous said…
कठीण काळ विसरून जगण्याची नवीन पालवी ही आपल्या आयुष्यात तशीच फुलेल अशी नवीन आशा ! खूप सुरेख

Popular posts from this blog

Dear 2024

Angel

Commitment!!